आजपासून गणेशोत्सव साजरा होत असुन हा गणेशोत्सव आनंददायी असुन यांचे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व कोपरगांव येथील करसल्लागार नितीन डोंगरे यांच्या लेखणीतून प्रासंगिक या सदरात खास सत्यप्रकाश न्युजच्या वाचकांसाठी....

गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा - संपादक 
कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
    आज पासून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणरायाचे घरघरात आगमन होणार असून हा उत्सव येणाऱ्या दहा दिवस अतिशय आनंद व उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे, या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना सत्यप्रकाश न्युज व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा, हा गणेशोत्सव आनंददायी असून याचे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व आहे ते खास कोपरगांव येथील करसल्लागार नितीन डोंगरे यांच्या लेखणीतून आपल्या सर्वांसाठी..
    गणपती उत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय उत्सव आहे.
भगवान गणेश यांची आराधना करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाचे महत्त्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप व्यापक आहे. त्याचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:
१)धार्मिक महत्त्व :
 हिंदू धर्मात, गणपतीला "विघ्नहर्ता" म्हणजेच भक्तांच्या कोणत्याही अडचणी दूर करणारा, निवारण करणारी देवता असे मानले जाते. त्याच्या आराधनेने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी आणि विघ्ने दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
   कोणत्याही पूजा विधी आरंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणपतीची  पूजा केली जाते, त्यामुळे आपण करीत असलेले शुभकार्य सुव्यवस्थित, विनाविघ्न पार पडत असते.
"गणेश चतुर्थी"  म्हणजे गणेशाच्या जन्माचा दिवस मानला जात असतो, आणि त्यादिवशी गणेशाची मूर्ती स्थापन करून मोठ्या श्रद्धेने तिची पूजा केली जाते.
२. सांस्कृतिक महत्त्व:
गणपती उत्सव हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अभिन्न असा भाग आहे. 
या उत्सवामुळे संगीत, नृत्य, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळते.
अनेक ठिकाणी गावागावात,लोक एकत्र येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात, ज्यामुळे समाजात "बंधुता आणि एकतेचा" संदेश दिला जातो.
महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, कोकण भागात
तर या उत्सवाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
३. सामाजिक महत्त्व:
गणपती उत्सवामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि त्यामुळे, विविध जाती, धर्माच्या लोकांमध्ये आपापसात स्नेहभाव निर्माण होत असतो.बंधुता वाढते.
तसं बघितलं तर, 
लोकमान्य टिळकांनी सन १८९३ साली गणपती उत्सवाला खऱ्या अर्थाने
सार्वजनिक स्वरूप दिले, त्या वेळी इंग्रज सरकार देशावर हुकूमत गाजवीत होते.
ब्रिटिश शासनाच्या विरोधात लढा उभारला जावा या उद्देशाने बहुधा त्याकाळी, लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळेच हा उत्सव जणू "राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक" बनलेला असल्याचे जाणवते.
   या दहा दिवसांच्या गणेशोत्सव  काळात अनेक मंडळांकडून, विविध सामाजिक कार्ये केली जातात जसे की, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण जागरूकता कार्यक्रम इत्यादी.४.आध्यात्मिक महत्त्व:
गणपतीचे विशेष गुण म्हणजे त्याला "मूळ विद्येची देवता"  मानले जाते. 
त्याची पूजा करणे म्हणजे जणू, समस्त भक्तांना बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी
देणाऱ्या रूपाची आपण पूजा करतो आहोत याचा प्रत्यय येत असतो.
गणपतीच्या रूपाने अनेक भक्त, साधकांना अज्ञानाचा नाश करण्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करण्याची प्रेरणा मिळते.
५.पर्यावरणीय महत्त्व:
 सध्या पर्यावरणाचा विचार करता,  गणपती मूर्तींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, मातीपासून बनविलेल्या किंवा शाडूच्या गणपती मूर्ती प्रत्येकाने पुजाव्यात असा एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे. आणि तो खरोखर योग्य असाच आहे, यामुळे जलप्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना जागरूक करण्यात मदत होते.
६. आनंद आणि उत्साहाचा उत्सव:
अगदी साधारणपणे विचार करता,गणपती उत्सवाचे  १० दिवस असतात,  आणि त्या काळात संपूर्ण वातावरण आनंदी आणि उत्साही असते. लोक मोठ्या थाटामाटात गणपतीची स्थापना करतात आणि दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला, त्या मूर्तीचे विसर्जनही जल्लोषात करतात.
   गणपती उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून तो भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचे जणू प्रतीक बनलेला आहे.
अशा या गणपती उत्सवाच्या निमित्ताने, 
आपणा सर्वांना अनकोत्तम शुभकामना!!
श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या कुटुंबात सर्वाना सुख, समाधान, आनंद प्राप्त व्हावा.. आपला-आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा, श्री गणेशाच्या कृपेने आपली सर्व विघ्ने, दुःख दूर सरावे. या विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांचे भले व्हावे अशी शुभकामना व्यक्त करून..
श्री गणेशाला आपण वंदन करू या...
     || गणपती बाप्पा मोरया ||
 शब्दांकन - नितीन डोंगरे,करसल्लागार                           कोपरगांव 

Post a Comment

Previous Post Next Post