येथील नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात मोठ्या उत्साहात व गौरवपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांनी भूषवले. पर्यवेक्षिका निर्जलाबेन सोनवणे, उपशिक्षिका श्रीमती बिनीता शहा, श्रीमती हेमलता बोरसे, तसेच श्री विपुल प्रजापत सर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमापूजनाने झाली. हे पूजन उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या हस्ते पार पडले. त्यासोबत शाळेतील उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देखील प्रतिमा पूजन केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनीही प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती कमलबेन परिख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची व विचारधारेची महती विशद केली. यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शाहू महाराजांना सामाजिक समतेचे शिल्पकार म्हणत, त्यांची शिक्षण, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्वांसाठी संधी निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना उपशिक्षिका श्रीमती हेमलता बोरसे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी शाहू महाराजांचे बालपण, त्यांचे शिक्षण, कोल्हापूर संस्थानचे कुशल प्रशासन, अस्पृश्यता निर्मूलनासाठीचे कार्य, तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी घेतलेली धडपड याचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.
त्यांनी सांगितले की, शाहू महाराज हे पहिले राजा होते ज्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षण, सरकारी नोकऱ्या व समाजातील विविध स्तरांमध्ये आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांनी ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ हे सूत्र अंगीकारून कोल्हापूर संस्थानात अनेक शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू केली. समाजातील शोषित, दलित, महिलांसाठी त्यांनी अनेक सुधारणा राबविल्या.
सामाजिक समतेच्या विचारांचे अग्रदूत म्हणून शाहू महाराजांचे योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करणारेही तेच पहिले राजा होते, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गीताबेन राजपूत यांनी तर आभारप्रदर्शन श्री विपुल प्रजापत यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार जाधव सर यांचे सदर कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले.
Tags:
शैक्षणिक