येथील श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात सखी सावित्री व विशाखा समिती अंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींसाठी विशेष सुरक्षा व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मुलींचे आरोग्य या विषयावर नवापूर येथील नामांकित स्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा कमलेश पाटील यांचे विद्यार्थिन्नींसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य मिलिंद वाघ तर मान्यवर म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक डी.एम. मंडलिक, गणेश महाजन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका मेघा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे सरांनी केले, त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमा मागील हेतू स्पष्ट करून दिला. तसेच डॉ.स्नेहा पाटील यांचा परिचय देखील त्यांनी करून दिला.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.स्नेहा पाटील म्हणाल्या की, आपल्या पूर्वीच्या आहारापेक्षा आताच्या आहारात फरक असल्याने कदाचित मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात तसेच सध्या कमी वयातील मुलांनाही हृदयविकाराचे धोके संभवू लागले आहेत यामागे आपली बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. खरंतर मुलांनी शाळेत येताना घरूनच डबा आणायला हवा, परंतु मुले बाहेरील फास्ट फूडचे सेवन करत असल्याने अनेक व्याधींना निमंत्रण देत असतात. विद्यार्थी जीवनात आपण गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर करणेही डोळ्यांच्या विकारासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या काळजीसाठी आपण आपल्या सवयी बदलल्या आणि चांगल्या जीवनशैली अवलंबल्या तर आपण सुदृढ राहू शकतो व त्याचा फायदा आपल्याला शिकत असतानाच नाहीतर आयुष्यभर होऊ शकतो. तसेच मुलींनी हार्मोनल बदल होतांना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या. जयश्री चव्हाण व मिनल पाटील यांनी सूचना दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले ; त्यांनी आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसूत्रीचा जीवनात वापर केला , तर आपणास आजार उद्भवणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. तर कविता खैरनार यांनी डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे महत्त्वाचे व गरजेचे असल्याने होणारे संभाव्य धोके आपण टाळू शकतो असे ही सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मिलिंद वाघ सर म्हणाले की, विद्यार्थी जीवनात शारीरिक आरोग्य जेवढे महत्वाचे तेवढी शिस्त ही महत्वाची असते. आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले; म्हणून आरोग्य जोपासण्यासाठी आपली जीवनशैलीला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला तर आपणास कोणताही शारीरिक विकार होणार नाही असे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थिंनीची शिस्त पाहून त्यांनी कौतुक व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मंजुषा वसावे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा समिती, सर्व शिक्षिका भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले...
Tags:
आरोग्य